Breaking
ब्रेकिंग

नवीमुंबई बेलापुरमध्ये मोठी दुर्घटना, चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली..

0 0 2 8 3 3

नवी मुंबई. दि.२७:-नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सेक्टर १९ मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. पहाटे ४.३० सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत एका रिक्षावाल्याच्या प्रसंगावधनामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबईसह नवी मुंबईमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. यातच ही मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटे ४ च्या सुमारास इमारतीखाली एक रिक्षावाला आला असता त्याला बिल्डींगच्या पिलरमधून आवाज येत होता. त्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ इमारतीतील रहिवाशांना जागे केले आणि इमारत रिकामी केली. अवघ्या १५ मिनिटांत इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर पुढील ५ मिनिटांत ही इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवासी भयभीत झाले आहेत.या दुर्दैवी घटनेत रिक्षावाल्यामुळे इमारतीतील सर्व रहिवाशांचे प्राण वाचले आहेत. पहाटे ही इमारत कोसळली, रस्त्यावरुन नागरिकांची ये-जा सुरु नव्हती यामुळे आणखी एक संभाव्य धोका टळला आहे. मात्र रहिवाशांचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. यामुळे रहिवाशांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. बेलापूर सेक्टर १९ मधील ही खूप जुनी इमारत होती. जुनी इमारत असूनही नोटीस बजावली गेली नाही का? असा सवाल या दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

या दुर्घटनेने संपूर्ण बेलापूर परिसर हादरला आहे. इमारत कोसळताच आजूबाजूच्या इमारतीतील लोकांनी एकच गर्दी केली आहे. तर अग्निशमन दलाच्या पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे