

१४ एप्रिल,रूपाली कदम :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुलांसाठी हे भाषण त्यांच्या महान कार्याची ओळख करून देणारे आहे. बाबासाहेब हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते आणि त्यांनी समानता, शिक्षण व अधिकारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. या भाषणात मुलांना सोप्या भाषेत बाबासाहेबांचे बालपण, त्यांना आलेल्या अडचणी, शिक्षणासाठी केलेली मेहनत आणि समाजासाठी केलेले कार्य याची माहिती दिली जाते.भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजातील शोषित-वंचित घटकांचे तारणहार आणि समानतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा प्रेरणादायी दिवस आहे. त्यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षण, स्वाभिमान आणि अधिकारांसाठी संघर्ष करत समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या जयंती निमित्त शाळेत आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थांना त्यांच्या विचारांवर बोलण्याची संधी दिली जाते. बाबासाहेबांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थांना त्यांचा अभ्यास देखील करावा लागतो.शाळेत किंवा कुठल्याही वासपिठावर भाषण देताना मुलांनी बाबासाहेबांच्या अफाट ज्ञानसागरातून कोणते मोती कसे वेचावे हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून आज आपण लहान मुलांनी भाषण कसे सादर करावे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज आपण सर्वजण भारताचे महान समाजसुधारक, विचारवंत आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ त्यांचा जन्मदिन नसून, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आणि शिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध लढण्यासाठी केला. त्यांनी समाजाला दिलेला सर्वात मोठा संदेश म्हणजे शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आपण शिक्षित होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या हक्कांसाठी उभे राहू शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान हक्क दिले
बाबासाहेबांनी भारतीय संविधान तयार करताना सर्वांना समान हक्क दिले. त्यांनी समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना महत्व दिले. आज आपण जी स्वातंत्र्य, समानता आणि अधिकार अनुभवतो, त्यामागे त्यांचे महान कार्य आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठीही मोठे योगदान दिले. स्त्रियांना शिक्षण, नोकरी आणि समान वागणूक मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी नेहमी सांगितले की, समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”
आजच्या काळातही बाबासाहबांचे विचार तितकेच महत्वाचे आहेत. जात-पात, भेदभाव आणि अन्याय अजूनही समाजात दिसून येतो. अशा वेळी आपण त्यांच्या विचारांचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्याला शिक्षण घ्यावे, एकमेकांशी प्रेमाने वागावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. डॉ. आंबेडकरांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मंत्र आजही प्रत्येक भारतीयासाठी मार्गदर्शक आहे. त्यांनी तयार केलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क आणि संधी मिळण्याचा मार्ग खुला झाला.
धार्मिक स्थळांवरील समान हक्कांसाठीचा ऐतिहासिक संघर्ष
त्यांच्या बंडाविषयी बोलायचे झाले तर हजारो अनुयायांसह महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन पाणी पिऊन आपला हक्क प्रस्थापित केला. हा सत्याग्रह मानवी हक्क आणि समानतेसाठीचा पहिला मोठा लढा मानला जातो. महाड सत्याग्रहानंतर, डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथातील अन्यायकारक विचारांचा निषेध करण्यासाठी त्याचे दहन केले. हा निषेध सामाजिक विषमता आणि जातिव्यवस्थेविरोधातील प्रतीकात्मक आंदोलन होता. त्यानंतर नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश नाकारला जात होता. तेव्हा आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी मोठा सत्याग्रह उभारला हा सत्याग्रह धार्मिक स्थळांवरील समान हक्कांसाठीचा ऐतिहासिक संघर्ष ठरला.
यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सत्याग्रह हे केवळ आंदोलन नव्हते, तर ते मानवी स्वाभिमान, हक्क आणि सामाजिक क्रांतीचे प्रतीक होते. त्यांच्या या लढ्यामुळे भारतीय समाजात मोठा बदल घडून आला आणि आजही त्यांच्या विचारांमुळे समानतेची वाट अधिक मजबूत होत आहे.
तर प्रिय मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनात अमलात आणण्यासाठी आहे. आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे शिक्षण घ्यावे, समाजासाठी काहीतरी चांगले करावे आणि एक आदर्श नागरिक बनावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण ठरवूया की, बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारू आणि एक समान, न्याय्य आणि प्रगत भारत घडवण्यासाठी प्रयत्न करू.




